बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव शनिवारी एकाच व्यासपीठावर येणार होते, मात्र नितीशकुमार यांनी या कार्यक्रमाला येण्याचे रद्द केल्याने जद(यू) आणि राजद एकत्र येण्याच्या प्रक्रियेत मोठा अडसर निर्माण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण एकत्र असल्याचे चित्र रंगविण्यासाठी मच्छीमार समाजाच्या महामेळाव्याला नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव जद(यू)चे अध्यक्ष शरद यादव यांच्यासह उपस्थित राहणार होते. या महामेळाव्याचे उद्घाटन नितीशकुमार यांच्या हस्ते होणार होते, मात्र त्यांनी ऐन वेळी हा कार्यक्रम रद्द केला.
याबाबत वार्ताहरांनी नितीशकुमार यांना विचारले असता ते म्हणाले की, अलीकडेच आपल्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली असल्याने आपण हा कार्यक्रम रद्द केला. महामेळाव्याच्या आयोजकांना आपण त्याची पूर्वकल्पना दिली आहे, असेही ते म्हणाले.
सर्व काही आलबेल असताना हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर न आल्याने जद(यू) आणि राजद यांच्यात बिनसले असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचा खुलासा महामेळाव्याचे आयोजक आणि राज्याचे पशुसंवर्धनमंत्री बैद्यनाथ साहनी यांनी केला आहे.