बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यातील मतभेदाचे वृत्त समोर येत आहे. त्यातच समाजवादी नेते विजय वर्मा यांनी शरद यादव नवा पक्ष सुरू करतील असे संकेत दिले आहेत. शरद यादव यांचे विश्वासू समजले जाणारे आणि दोन वेळा बिहार विधान परिषदेचे सदस्य राहिलेल्या विजय वर्मांनी शरद यादव हे महाआघाडीत कायम राहण्यासाठी त्यांनी एका नव्या पक्षाचे संकेत दिले आहेत. परंतु, जेडीयूचे सरचिटणीस के.सी.त्यागी यांनी मात्र ही अफवाच असल्याचा खुलासा केला आहे.

जेडीयूचे प्रदेश प्रवक्ते अजय आलोक यांनी बुधवारी शरद यादव यांच्या नाराजीचे वृत्त फेटाळले आहे. तर दुसरीकडे, वर्मा यांनी शरद यादव हे आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या संपर्कात असून सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा करत असल्याचे फोनवरून सांगितले. ते म्हणाले, नव्या पक्षाची स्थापना हा एक पर्याय आहे. यावर गंभीरपणे विचार केला जात आहे. शरद यादव हे धर्मनिरपेक्ष पक्षांच्या महाआघाडीत राहणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेस नेते गुलामनबी आझाद आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतली होती.

शरद यादव यांनी एनडीए सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी होण्यासाठी नकार दर्शवला आहे. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे नितीश कुमार यांनी तडकाफडकी राजीनामा देत भाजपच्या पाठिंब्यावर सरकारची स्थापनाही केली होती. नितीश कुमार यांच्या या निर्णयावर राज्यसभा खासदार शरद यादव यांनी सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केली होती.

सोमवारी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना शरद यादव यांनी आपली नाराजी दर्शवताना जनादेश यासाठी नव्हता असे म्हटले होते. महाआघाडी तुटणे अप्रिय आणि दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले होते. परंतु, यादव यांचेच निकटवर्तीय असलेल्या त्यागी यांनी नवीन पक्षाच्या अफवा असल्याचे म्हटले. भाजपबरोबर जाण्याचा त्यांनी कधीच विरोध केलेला नाही. मी त्यांना ४० वर्षांपासून ओळखतो. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनच ते लालूप्रसाद यांच्यापासून वेगळे झाले होते. मग अशापरिस्थितीत ते लालूंबरोबर कसे जातील, असा उलट सवाल त्यांनी विचारला.