बायकोच्या इच्छा आणि ऐशोआरामाचं आयुष्य जगता यावं यासाठी सूरतमधील एका हिरे कारागिराने चक्क मोटारसायकल चोरण्यास सुरुवात केल्याचं उघड झालंय. सूरत क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी या बाईक चोराला अटक केली असून बलवंत चौहान असं त्याचं नाव आहे. बलवंतची पत्नी आपल्या मोठ्या बहिणीच्या ऐशोआरामाच्या लाईफस्टाईला भुलून पतीला जास्त पैसे कमाव असा तगादा लावायची. यामुळे बलवंतने बाईक चोरायला सुरुवात केली.

हिरे कारागिर असलेल्या बलवंतला महिना १५ ते २० हजारापर्यंत पगार मिळायचा. परंतू त्याचा साडू हा बिल्डर असल्यामुळे त्याच्याकडे पैसा असायचा. त्यातच लॉकडाउनमध्ये बलवंतचा रोजगार तुटल्यामुळे त्याला आर्थिक चणचण भासायला लागली होती. त्यामुळे बायकोकडून वारंवार टोमणे ऐकायला लागत असल्यामुळे बलवंतने बाईक चोरण्याचा निर्णय घेतला. कापोदरा, वरचा, अमरोली, कातरगाम या भागांत बलवंतने किमान ३० बाईक चोरल्या. पोलिसांनी या सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

शॉपिंग कॉम्पेक्स आणि हिरे व्यापाऱ्यांकडे कामाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बलवंत नजर ठेवून असायचा. त्यांच्या कामाला येण्या-जाण्याच्या वेळा माहिती असल्यामुळे त्याला पार्किंग लॉटमधून बाईक चोरणं सोपं जायचं. दुपारी जेवण्याची वेळ बलवंत चोरीसाठी साधायचा. अखेरीस सूरत पोलिसांच्या पथकाने सापळा रचत बलवंतला अटक केली आहे.