News Flash

अर्थशास्त्रातील नोबेलचे मानकरी जाँ तिरोल

बाजारपेठेची ताकद आणि त्याचे नियमन यावर मूलभूत संशोधन करणारे फ्रेंच अर्थतज्ज्ञ जाँ तिरोल यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

| October 14, 2014 01:10 am

बाजारपेठेची ताकद आणि त्याचे नियमन यावर मूलभूत संशोधन करणारे फ्रेंच अर्थतज्ज्ञ जाँ तिरोल यांना यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘आपल्या काळातील सर्वात प्रभावी अर्थशास्त्रज्ञांपैकी एक’ अशा शब्दांत ‘रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ने त्यांचा गौरव केला आहे. काही मोजक्याच कंपन्यांची उद्योगजगतावरील मक्तेदारी कशी हाताळायची या प्रश्नाची उकल करणे तिरॉल यांच्यामुळे शक्य झाल्याचे अकादमीने त्यांचा गौरव करताना म्हटले आहे.
तिरोल हे ६१ वर्षीय असून त्यांनी मॅसॅच्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पीएच.डी. प्राप्त केली आहे. सध्या ते फ्रान्समधील ‘तुलाँ स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेत कार्यरत आहेत. मोजक्याच कंपन्यांची मक्तेदारी उद्योगांवर नियमनाअभावी कायम राहिल्यास त्यामुळे अनुत्पादक कंपन्यांची बाजारपेठेवरील पकड कायम राहणे, एखाद्या विशिष्ट उत्पादनाच्या किमतीत अवांछनीय वाढ होणे यांसारखे दुष्परिणाम होतात. बाजारपेठेच्या अशा मर्यादांवर ८० च्या दशकात तिरॉल यांनी आपल्या संशोधनाद्वारे प्रकाश पाडला.
मक्तेदारीच्या आव्हानाचा सामना कसा करावा, कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रिया सरकारने कशा हाताळाव्यात अशा प्रश्नांवरील उत्तरे तिरोल यांच्या संशोधनातून पुढे आली. आपल्या विविध पुस्तकांद्वारे तसेच शोधनिबंधाद्वारे अशा समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याचे थेट मार्गदर्शन तिरॉल यांनी धोरणकर्त्यांना केले. दूरसंचार क्षेत्रापासून ते बँकिंग क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांतील मक्तेदारीच्या समस्येवर या जाणत्या अर्थशास्त्रज्ञाने सविस्तर भाष्य केले. २००८ मध्ये जगभर आर्थिक मंदीची गडद छाया होती. त्या छायेत बँकांचे नियमन कसे करावे या प्रश्नाचे उत्तर तिरॉल यांच्या संशोधनातून जगभरातील अनेक देशांच्या सरकारांनी शोधले, अशा शब्दांत हार्वर्ड विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ फिलीपी अघियॉन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आर्थिक संकट आणि नियमनातील अपयश
२०१२ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत जाँ तिरॉल यांनी २००८ मधील आर्थिक मंदीचे विस्तृत विवेचन केले होते. सरकारला नियमन करण्यात आलेले अपयशच या संकटास प्रामुख्याने जबाबदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. बाजारपेठेच्या कार्यक्षमतेवर अर्थतज्ज्ञांनी दाखवलेला अमर्याद विश्वास हा प्रत्यक्षात काळाच्या ३० वर्षे मागे असलेल्या कल्पनेवरील विश्वास आहे, असे विधान जाँ तिरॉल यांनी या मुलाखतीत केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 1:10 am

Web Title: jean tirole wins nobel prize in economics
Next Stories
1 नऊ वर्षांत पहिल्यांदाच ‘आरटीआय’ अधिवेशन नाही!
2 आंध्र, ओदिशाचे किनारे उद्ध्वस्त
3 थरूर यांची काँग्रेस प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
Just Now!
X