आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा साखळीतील ‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ ही परीक्षा ३ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करून ही परीक्षा घेतली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

केंद्रीय संस्थांतील प्रवेश जेईईच्या गुणांनुसार होतात. जेईई मुख्य परीक्षा आणि जेईई अ‍ॅडव्हान्स अशा दोन परीक्षा घेण्यात येतात. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलल्यानंतर, जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती.

…तर जेईई विद्यार्थ्यांना पुन्हा संधी -धर्मेंद्र प्रधान

दरम्यान राज्यातील पूरग्रस्त सात जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना २७ जुलैपर्यंत होणाऱ्या जेईई (मुख्य) तिसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर जाता आले नाही, तर त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतलेला आहे.

कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीमुळे या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.