करोनाचा शिरकाव झाल्यापासून देशातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून गेलं आहे. गेल्या वर्षी अनेक परीक्षा उशिराने घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याची घोषणा केली आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.

करोनाच्या संकटात विद्यार्थ्यांचं आरोग्य लक्षात घेऊन परीक्षा रद्द वा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याकडे राज्य सरकारांसह केंद्राचा कल दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता जेईई मेनची परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फेब्रवारी आणि मार्चमध्ये पहिले दोन सत्रातील परीक्षा पूर्ण झालेल्या असून, एप्रिलच्या सत्रात घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २७, २८ आणि ३० एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. परीक्षेसाठी सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या १५ दिवस आधी ही तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील परीक्षाचं काय?

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात दिवसाला ६० हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून येत असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे राज्य सरकारने पहिली ते ११ वी पर्यंतच्या परीक्षा रद्द केल्या असून, इयत्ता १० व १२वीच्या परीक्षा पुढे ढललल्या आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.