जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरविरोधात ठोस पुरावे मागणा-या चीनला भारताने खडेबोल सुनावले आहेत. मसूद अझहरची कृत्ये आमच्याकडे दस्तावेजाच्या स्वरुपात उपलब्ध असल्याचे भारताने म्हटले आहे.

भारत आणि चीनमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चा सुरु असून बुधवारी चीनच्या अधिका-यांशी चर्चा केल्यावर भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली अशी माहिती त्यांनी दिली. मसूद अझभरला जागतिक स्तरावर दहशतवादी घोषित करुन त्याच्यावर बंदी घालण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या अर्जाचा उल्लेख भारताने केला. मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी अन्य देशांनीही पुढाकार घेतल्याचे भारताने निदर्शनास आणून दिले. १२६७ समितीच्या कारवाईनुसार जैश ए मोहम्मदवर निर्बंध घालण्यात आले. या कारवाईत जैश ए मोहम्मद आणि मसूद अझहरविरोधातील ठोस पुरावे उपलब्ध आहेत. हे पुरावे सिद्ध करण्याची जबाबदारी आमची नाही असे भारताने नमूद केले. आण्विक पुरवठादार गटात भारताचा समावेश करण्यावर चीनने चर्चेची तयारी दर्शवली आहे. चीनची एक भूमिका आहे. पण त्यांनी चर्चेची तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले.

मसूद अझहर याला दहशतवादी घोषित करावे असा भारताचा प्रस्ताव आहे. भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीला मार्च २०१६ मध्ये अर्ज दिला आहे. भारताचा अर्ज चीनने तांत्रिक मुद्द्याच्या आधारे रोखून ठेवला होता. भारताने मांडलेला मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या आवश्यकतांची पूर्तता करत नसल्याचे चीनने म्हटले होते. सुरक्षा परिषदेत १५ देश असून यात फक्त चीनकडून भारताच्या प्रस्तावात आडकाठी आणली जात आहे