भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझहरला सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तान बरीच मेहनत घेत आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या असलेला मसूद अझहर भारताच्या रडारवर आहे. पाकिस्तानने त्याला आता बहावलपूरमधून रावळपिंडी येथे हलवले आहे. इंटेलिजन्सच्या सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. बहावलपूरमध्ये जैशचे मुख्यालय आहे. पुलवामा हल्ल्यानंतर बहावलपूरमधल्या जैशच्या मुख्यालयाला टार्गेट करण्यात येईल असे बोलले जात होते.

बालाकोट एअर स्ट्राइकच्या रात्री भारताची फायटर जेटस बहावलपूरच्या दिशेने जात आहेत असे दाखवून पाकिस्तानची दिशाभूल करण्यात आली होती. तीन मार्च रोजी मसूदला रावळपिंडीला हलवण्यात आले. त्याला तेथील एका सुरक्षित घरामध्ये ठेवण्यात आले आहे.

एफएटीएफच्या बैठकीआधी पाकिस्तानने बेपत्ता घोषित केलेला कुख्यात दहशतवादी मसूद अझहर अमेरिका-तालिबान शांती करारानंतर समोर आला. अमेरिका-तालिबान करारावर त्याने ऑडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. भारताला हवा असलेला हा मोस्ट वाँटेड दहशतवादी बेपत्ता असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले होते.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या मसूद अझहरने अमेरिकेबरोबर झालेल्या शांती करारासाठी तालिबानच्या आधीच्या आणि विद्यमान नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या. मसूदने जैशशी संबंधित असलेल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून हा संदेश जारी केला होता.

“अफगाणिस्तानात अमेरिकेचा वावर लांडग्यासारखा होता. पण आज दोहा कतारमध्ये जिहादने एक उंची गाठली आहे, अपेक्षा खूप आहेत. लांडग्याची शेपटी कापली असून, दात उखडले गेले आहेत” असे मसूदने त्याच्या ऑडिओ संदेशात म्हटले होते.