सोमवारी सकाळपासून जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागामध्ये भारतीय फौजा आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. शोपियानच्या रावलपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर सज्जाद अफगानी याचा खात्मा करण्यात भारतीय फौजांना यश आलं आहे. सज्जाद जैशसाठी नव्या तरूणांना भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या यंत्रणेत सहभागी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, ही धुमश्चक्री अजूनही सुरू असल्याची माहिती मिळत असून अजूनही दोन दहशतवादी रावलपोरामधल्या एका घरात लपले असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात एएनआयने ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांविरोधातली ही मोहीम शनिवारी संध्याकाळपासूनच सुरू करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलिसांना रावलपोरा गावामध्ये दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाली होती. पण प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी फौजांनी पावलं उचलताच ज्या गावकऱ्यांनी फौजांना माहिती दिली, तेच गावकरी दहशतवाद्यांसोबत गावातल्या घरात अडकल्याचं फौजांना समजलं. त्यामुळे हे ऑपरेशन थांबवण्यात आलं. त्या सगळ्यांना बाहेर काढल्यानंतरच फौजांनी कारवाई सुरू केली.

याआधी ११ मार्च रोजी देखील जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं होतं. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये हे दोन दहशतवादी सापडले होते.