जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आशिक बाबा याने सुरक्षा यंत्रणांकडून होत असलेल्या चौकशीदरम्यान संघटनेच्या कारवायांचा खुलासा केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. श्रीनगरमधील दहशतवादी कारवायांसाठी पुढाकार घेणाऱ्या या दहशतवाद्याने सांगितले की, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुदाहिद्दीन या तीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना एकत्रीतपणे भारताविरोधात हल्ले घडवून आणत आहेत.

२०१७ मध्ये पुलवामा पोलीस वसाहतीवर झालेला दहशतवादी हल्ला जैशचा काश्मीरमधील कमांडर मुफ्की वकास याच्या नेतृत्वात झाला होता. याच दहशतवादी हल्ल्यात ८ जवान शहीद झाले होते. नगरोटा येथील लष्कराच्या कँपवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आशिक बाबा याच्या सहभागावरुन त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने दहशतवादी कारवायांच्या योजनांची माहितीही दिली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

आशिक बाबा हा जैशच्या दहशतवाद्यांच्या कँपमध्ये राहिलेला नव्हे तर तो या संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहरच्या जवळच्या टॉप दहशतवाद्यांना देखील भेटला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना आशा आहे की, आशिक बाबा या जिहादी नेत्यांच्या कारवायांची माहिती देऊ शकतो.

आशिक बाबाने दावा केला आहे की, जैश सध्या पाकिस्तानच्या खैबर प्रांतातील पख्तूनख्वा या प्रातांत मनशेरा येथ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. ही जागा तोयबा आणि मुजाहिद्दीन या संघटनांच्या प्रशिक्षण स्थळांजवळच आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआय यांच्या निरीक्षणाखाली या तीनही दहशतवादी संघटना एकत्रितरित्या भारतविरोधी कट कारस्थान करत आहेत.

आशिक बाबाने चौकशीदरम्यान हा दावा देखील केला आहे की, काश्मीरमध्ये सीमापलिकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया घडवून आणण्याची जबाबदारी अब्दुल्ला नामक दहशतवाद्यांवर सोपवण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, बाबाने गेल्या काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये जैशसाठी महत्वपूर्ण भुमिका बजावली होती. सीमेपलीकडून येणाऱ्या या दहशतवाद्यांमध्ये काश्मीरमध्ये घुसवण्यात, त्यांना हत्यारे पुरवण्यात, हल्ल्यांची ठिकाणांची माहिती देण्यात आणि या ठिकाणांपर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी आशिक बाबाला गल्फ देशांमधून मोठा पैसा मिळत होता.