पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ पुन्हा सक्रीय झाले आहेत अशी माहिती वरिष्ठ सरकारी सूत्रांनी दिली. बालाकोटमधील जैशच्या तळावर ५० दहशतवाद्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. २६ फेब्रुवारीला इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांनी हे दहशतवादी तळ एअर स्ट्राइकमध्ये उद्धवस्त केले होते. भारताने हा एअर स्ट्राइक करुन १४ फेब्रुवारीला पुलवामामधील सीरआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला होता.

पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैशने बालाकोटमधील आपले तळ पुन्हा सक्रीय केल्याची माहिती सूत्रांनी दिली. इथे प्रशिक्षण घेणाऱ्या दहशतवाद्यांना काश्मीर आणि अफगाणिस्तानात आत्मघातकी हल्ल्यासाठी तयार करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांचे या तळावर घडणाऱ्या घडामोडींवर अत्यंत बारीक लक्ष आहे. टेक्निकल आणि अन्य टेहळणी माध्यमातून मागच्या आठवडयातच ही माहिती उपलब्ध झाली आहे.

भारतातील सुरक्षा दलाच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी बालाकोटमधून दहशतवादी पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे. मागच्या महिन्यात जवळपास ५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले होते. भारतीय लष्कराने सुद्धा पाकिस्तानच्या नापाक हरकतीला जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे म्हटले होते.

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तानने बालाकोटमध्ये दहशतवादी तळ सुरु केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. पुन्हा स्ट्राइक करणार का? या प्रश्नावर बिपीन रावत यांनी आम्ही पुन्हा तशीच कारवाई का करु? त्याच्यापुढे का जाऊ नये? आम्ही काय करु शकतो यावर त्यांनाच विचार करुं दे असे उत्तर त्यांनी दिले होते. भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर इंडियन एअर फोर्सच्या मिराज-२००० फायटर विमानांनी बालकोटच्या तळावर इस्रायली बनावटीच्या स्पाइस बॉम्बने हल्ला केला होता. भारताच्या हवाई हल्ल्यात काही नुकसान झाले नाही हे पाकिस्तानने दाखवण्याचा खोटा प्रयत्न केला. प्रत्यक्षात भारताने ज्या ठिकाणी कारवाई केली तिथे प्रसारमाध्यमांना ते दोन महिन्यांनंतर घेऊन गेले.