12 November 2019

News Flash

आश्चर्यकारक : डासांनी केलं जेट एअरवेजचं विमान एक तास लेट

केबिन क्रूनं डास मारण्यासाठी बेगाॅन स्प्रेचे फवारे मारले. त्यानं काही फारसं होईना मग शेवटी जेटचे कर्मचारी डास मारायच्या रॅकेट घेऊन आले.

संपूर्ण विमानात त्यांनी रॅकेट फिरवत डासांचा बऱ्यापैकी समाचार घेतला.

योगेश मेहेंदळे, मुंबई

जेट एअरवेजचं मुंबईवरून दिल्लीला जाणारं विमान बुधवारी एक तास उशीरा सुटलं. यात खरं तर आश्चर्य नाही पण ज्या कारणासाठी उड्डाणाला विलंब झाला ते मात्र विस्मयकारक आहे. हे विमान चक्क डासांमुळे खोळंबल होतं.

जेट एअरवेजचं 9W 762 हे विमान मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी बुधवारी सकाळी सहा वाजता उडणं अपेक्षित होतं. पहाटे पाचच्या सुमारास प्रवाशांना चेक इन करण्यास सुरूवात झाली. परंतु विमानाच्या दरवाजातच डासांच्या झुंडींनी प्रवाशांचं स्वागत केलं. आतमध्ये ठीक असेल असा विचार करून सगळे प्रवासी आपापल्या जागांवर विराजमान झाले. परंतु विमानाच्या आतमध्येही सगळीकडे डास होते.

प्रवाशांनी याबाबत तक्रार केली असता केबिन क्रूनं डास मारण्यासाठी बेगाॅन स्प्रेचे फवारे मारले. त्यानं काही फारसं होईना मग शेवटी जेटचे कर्मचारी डास मारायच्या रॅकेट घेऊन आले. संपूर्ण विमानात त्यांनी रॅकेट फिरवत डासांचा बऱ्यापैकी समाचार घेतला.

या सगळ्या धबडग्यात विमानाचं उड्डाण सातच्या सुमारास म्हणजे एक तास उशीरानं झालं. अर्धवट झोपेत भल्या पहाटे घर सोडलेल्या प्रवाशांची या सगळ्या त्रासामुळे चिडचिड झाली असताना जखमेवर मीठ चोळलं गेलं जेटच्या पायलटच्या नेहमीच्या सरावाच्या उदघोषणेनं.

विमान दिल्लीच्या जवळ आल्यावर वैमानिकानं तशी कल्पना दिली व तुमचा प्रवास आनंददायी झाला असेल अशी आशा व्यक्त केली. यावर विमानात एकच हशा पिकला. इतकी वर्ष विमान प्रवास करतोय पण डासांच्या झुंडी व त्यामुळे उड्डाणाला झालेला उशीर पहिल्यांदाच बघतोय अशी सामायिक प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करत होते.

First Published on March 6, 2019 10:34 am

Web Title: jet airway mumbai delhi flight delay one hour because of mosquito