मुंबईहून लंडनला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्याची घटना घडली आहे. जेट एअरवेजच्या विमानात ३०० प्रवासी होते. जेट एअरवेजच्या विमानाचा संपर्क तुटल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र काही वेळानंतर विमानाशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. जर्मनीवरुन उड्डाण करत असताना हा सर्व प्रकार घडला.

जेट एअरवेजचे 9W 118 मुंबईवरुन लंडनला जात होते. विमान जर्मनीवरुन जात असताना विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. यानंतर लगेचच जर्मन हवाई दलाची दोन विमाने जेट एअरवेजच्या विमानाचा शोध घेण्यासाठी झेपावली. जर्मनीच्या कोलोन शहरावरुन उड्डाण सुरू असताना हा संपूर्ण प्रकार घडला. जर्मनीच्या हवाई दलाने सतर्कता दाखवत संपर्क तुटलेल्या विमानाच्या शोधासाठी दोन विमाने पाठवली. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल डिजीसीएला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत विमानातील कर्मचाऱ्यांना विमान उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

द एविशन हेरॉल्ड नावाच्या एका संकेतस्थळाने जर्मनीचे लढाऊ विमाने जेट एअरवेजच्या बाजूने उड्डाण करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जर्मन हवाई दलाची दोन विमाने जेट एअरवेजच्या विमानाजवळून उड्डाण करताना दिसत आहेत. जेट एअरवेजकडून अद्याप या संपूर्ण प्रकाराबद्दल प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. द एविएशन हेराल्‍डने दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजचा नियंत्रण कक्षासोबत संपर्क प्रस्थापित झाल्यानंतरही काही वेळ जर्मनीची लढाऊ विमाने जेट एअरवेजच्या विमानासोबत उडत होती. जेट एअरवेजच्या विमानाच्या काही अंतरावरुन जर्मन लढाऊ विमानांचे उड्डाण सुरू होते.