News Flash

जेट एअरवेज पुन्हा उडणार! NCLT ने स्वीकारला कारलॉक-जालनचा प्रस्ताव

जेट एअरवेजने आर्थिक संकटामुळे १७ एप्रिल २०१९ मध्ये आपलं काम थांबवलं आहे

जेट एअरवेजने आर्थिक संकटामुळे १७ एप्रिल २०१९ मध्ये आपलं काम थांबवलं आहे

आर्थिक संकटात अडकलेली जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डाण करण्याच्या तयारीत आहे. वित्तसंस्था नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने कारलॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांनी जेट एअरवेज चालवण्यासंदर्भात ठराव आराखडा कर्जदारांसमोर मांडला होता. याच ठरावाला मंजुरी देण्यात आल्याने जेट एअरवेज पुन्हा आकाशात उड्डाण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. जेट एअरवेजने आर्थिक संकटामुळे १७ एप्रिल २०१९ मध्ये आपलं काम थांबवलं आहे.

९० दिवसांमध्ये मिळवायच्या आहेत मंजुरी

कारलॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालन यांना ९० दिवसांमध्ये संबंधित यंत्रणांकडून मंजुरी मिळवायच्या आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी कॅलरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालन यांनी लावलेल्या बोलीला कर्जदारांनी मान्यता दिली होती. मात्र या दोन्ही कंपन्यांकडे एअरलाइन्स चालवण्याचा अनुभव नाही. कॅलरॉक कॅपिटल एक अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे तर मुरारी लाल जालन संयुक्त अरब अमिरातीमधील उद्योजक आहेत.

१३७५ कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

ठराव योजनेनुसार, जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी १३७५ कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्याच्या आत इतर ३० विमान कंपन्यांसोबत जेट एअरवेज पुन्हा काम सुरु करेल असंही सांगण्यात आलं आहे.

२०१९-२० मध्ये २८४१ कोटींचं नुकसान

जेट एअरवेजला मार्च २०२० ला आर्थिक वर्षाच्या अखेरीस २८४१ कोटींचं नुकसान झालं होतं. कंपनीची विमानसेवा जवळपास गेल्या दोन वर्षांपासून स्थगित आहे. कंपनीने बीएसईकडे दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये कंपनीचं एकूण उत्पन्न ३५४ कोटी रुपये होतं. याआधीच्या आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कंपनीला ५५३५ कोटींचं नुकसान झालं होतं. कंपनी सध्या दिवाळखोरीच्या संकटात आहे.

भारतात करोनामुळे प्रवाशांची मागणी कमी होण्याच्या आधीपासूनच विमानसेवेतून पैसा कमवणं आव्हानात्मक झालं आहे. विमान तिकीटांवरुन सुरु असलेली स्पर्धा तसंच महागड्या तिकीटांमुळे अनेक विमान कंपन्या मार्केटमध्ये टिकून राहावं यासाठी धडपडत आहेत. एकेकाळी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी असणारी किंगफिशर एअरलाइन्स २०१२ मध्ये बंद पडली असून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली एअर इंडियादेखील कित्येक वर्षांपासून खरेदीदाराचा शोध घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 4:52 pm

Web Title: jet airways nclt approves kalrock capital murari lal jalan consortium resolution plan sgy 87
Next Stories
1 सरकारच्या आकडेवारीपेक्षा करोना मृतांची संख्या ४३ पट जास्त; अखिलेश यादव यांचा दावा
2 Corona Vaccine: डेल्टा व्हेरिएंटवर लसींचा प्रभाव नाही; WHO चा दावा
3 “करोनाच्या आधीच्या व्हेरिएंटमुळे ऑक्सिजन पातळी कमी व्हायची, पण डेल्टा प्लसमुळे…!”
Just Now!
X