आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जेट एअरवेजवर युरोपात विमान जप्तीची नामुष्की ओढवली आहे. देणी चुकवली नाहीत म्हणून नेदरलँडच्या अॅमस्टरडॅम विमानतळावर जेट एअरवेजचे विमान जप्त करण्यात आले आहे. जेट एअरवेजच्या वैमानिकांनी सुद्धा थकलेल्या वेतनावरुन कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देणारी नोटीस बुधवारी कंपनीला पाठवली.

२५ वर्ष जुनी जेट एअरवेज आज अत्यंत भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. मुंबई हे जेट एअरवेजचे मुख्य केंद्र आहे. पैसे नसल्यामुळे जेटची बरीच उड्डाणे बंद झाली असून सध्या अवघी ३२ उड्डाणे सुरु आहेत. देणी चुकवता आली नाहीत म्हणून कार्गो सेवा देणाऱ्या कंपनीने जेटचे बोईंग विमान जप्त केले आहे. विमान जप्त होण्याची जेटसाठी ही पहिलीच वेळ आहे.

मागच्या आठवडयात रक्कम थकविल्याप्रकरणी जेट एअरवेजच्या विमानांना बंद करण्यात आलेला इंधनपुरवठा सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या तेल कंपनीने दोन तासांनंतर पूर्ववत केला.

कर्ज पूनर्रचना योजनेतंर्गत एसबीआयच्या नेतृत्वाखाली बँकांचा समूह जेटचे व्यवस्थापन आपल्या हातात घेणार आहे. २५ मार्चला एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने बनवलेल्या योजनेला जेट एअरवेजच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्या अंतर्गत जेटमध्ये १५०० रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. जेटची बिघडती स्थिती लक्षात घेऊन संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नीने संचालक मंडळाचा राजीनामा दिला.