विमानाच्या कॉकपीटमध्येच वैमानिक आणि सह वैमानिक यांच्यात झालेल्या भांडणामुळे जेट एअरवेज कंपनी चर्चेत आली होती. आता याच भांडण करणाऱ्या वैमानिकांना जेट एअरवेजने घरचा रस्ता दाखवला आहे. विमानाच्या कॉकपीटमध्येच मुख्य वैमानिकाने त्याच्या महिला सह वैमानिकाला मारहाण केल्याचा प्रकार १ जानेवारी रोजी लंडन-मुंबई विमानात घडला. त्यानंतर या प्रकरणी जेट एअरवेजने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. विमान इराण आणि पाकिस्तानच्या हद्दीतून जात असताना हा प्रकार घडल्याचे समोर आले. 9 W 119 या विमानात हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. ज्यानंतर या दोघांनाही तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

मुख्य वैमानिक गेल्या १० वर्षांपासून ‘जेट एअरवेज’मध्ये काम करत आहे. संबंधित महिला सह-वैमानिकाशी त्याचा यापूर्वीही वाद झाला होता, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची माहिती नागरी ‘नागरी उड्डाण महासंचालनालया’ला (डीजीसीए) देण्यात आली असून या प्रकरणी ‘जेट’ने चौकशी सुरु केली होती. मुख्य वैमानिकाने मारहाण केल्यानंतर महिला सह वैमानिक कॉकपीटमधून बाहेर आली होती. शेवटी मुख्य वैमानिकाने तिची मनधरणी केली आणि दोन्ही वैमानिक पुन्हा कॉकपीटमध्ये गेले. दोन्ही वैमानिकांनी प्रवासादरम्यानच कॉकपीटमधून बाहेर येणे, हा गंभीर प्रकार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

इतकेच नाही तर आणखी एका समोर आलेल्या माहितीनुसार हे दोघे म्हणजे वैमानिक आणि त्याची महिला सहकारी असलेली सहवैमानिक पती-पत्नी असल्याचचेही समोर आले होते. या दोघांचा भांडणामुळे एक-दोन नाही ३२४ प्रवाशांचा जीव काही काळासाठी टांगणीला लागला होता. भांडण करताना हे दोघेही दोनवेळा कॉकपीटच्या बाहेर आले होते. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. काही मिनिटांमध्ये या दोघांचे भांडण मिटले मात्र तोपर्यंत प्रवासी प्रचंड चिंतेत बुडाले होते. या दोघांचे भांडण समजल्यावर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता मात्र या दोघांचीही जेट एअरवेजमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.