जेट एअरवेज बंद झाल्याचा अनेक जोडप्यांना दुहेरी फटका बसला आहे. जेट एअरवेजमधल्या ४० टक्के कर्मचाऱ्यांचा परस्परांशी विवाह झालेला आहे. पती आणि पत्नीची एकाचवेळी नोकरी गेल्यामुळे कुटुंबातील दुहेरी उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला आहे. मिड डे ने हे वृत्त दिले आहे. स्थिर, आरामदायी आयुष्य जगणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता रोजचे खर्च भागवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

मागच्या तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे घराचे हप्ते थकले असून मुलांच्या शाळांची फी देखील भरता आलेली नाही असे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले. कंपनीच्या ग्राहक सेवा विभागात काम करणाऱ्या महिलेचा पती जेटमध्येच नोकरी करतो. नवरा केबिन क्रू चा सदस्य होता. दोघांची जेटमध्येच पहिल्यांदा ओळख झाली.

ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर दोघेही विवाहबद्ध झाले. पण आता एकाचवेळी दोघांची नोकरी गेली आहे. त्यामुळे नवीन विकत घेतलेल्या घराचे हप्ते फेडणे शक्य होत नाहीय असे एका महिला कर्मचाऱ्याने सांगितले. जेटमध्येच पती आणि पत्नी नोकरीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांच्या घरात आहे. जेटला बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्यामुळे जेटची सर्व उड्डाणे बंद झाली आहेत. जेट ही भारतातील पहिली खासगी हवाई कंपनी आहे. एअर इंडिया व्यतिरिक्त फक्त जेटच्या विमानांकडे परदेशात उड्डाणाचा परवाना होता. आता कदाचित भविष्यात कंपनी सुरु होईल एवढीच कर्मचाऱ्यांना आशा आहे.