खासगी हवाई कंपनी जेट एअरवेजचे उपाध्यक्ष (सुरक्षा) कर्नल अवनीतसिंग बेदी यांना जमीन हडपल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अवनीतसिंग यांनी दिल्लीतील जमिनीवर अवैधरित्या कब्जा केल्याचा आरोप आहे. रविवारी सकाळी साहिबाबाद पोलिसांनी त्यांनी अटक केली.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार कोट्यवधी किमतीची महानगरपालिकेची जमीन हडपल्याचा अवनीतसिंग यांच्यावर आरोप आहे. अवनीतसिंग यांनी मार्च २०१५ मध्ये जेट एअरवेजमध्ये काम करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्याकडे कॉर्पोरेट सुरक्षा आणि लष्कराचा सुमारे ४० वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. जेट एअरवेजमध्ये येण्यापूर्वी ते वॉलमार्ट इंडिया लि.मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते.

कोट्यवधींची किंमत असलेल्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी अवनीतसिंग यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अवनीतसिंग हे जेट एअरवेजमध्ये सुरक्षेशी संबंधित विभागाचे काम पाहतात.