टॉप लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने इराकमधील दोन अमेरिकन तळांवर बुधवारी मिसाइल हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराकमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या अत्याधुनिक फायटर जेटसनी लगेच हवेत झेप घेतली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

बगदादच्या आकाशात घिरटया घालणारी अमेरिकेची फायटर जेटस अनेकांनी पाहिली. बगदाद ही इराकची राजधानी आहे. एएफपीच्या प्रतिनिधीने सुद्धा या फायटर जेटसचे उड्डाण पाहिले. पण ही विमाने कुठली होती, ते समजू शकलेले नाही.

अमेरिकेकडे एफ-१६, एफ-२२, एफ-३५ ही अत्याधुनिक फायटर विमाने आहेत. त्यातील एफ-२२ आणि एफ-३५ स्टेल्थ तंत्रज्ञानाने युक्त असून रडारही या विमानांना पकडू शकत नाही.

आणखी वाचा – क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इराणकडून पहिली प्रतिक्रिया

काय आहे इराणची पहिली प्रतिक्रिया?
इराणनं बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. आपण स्वसंरक्षणासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं स्पष्टीकरण यावेळी इराणकडून देण्यात आलं. या हल्लानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी प्रतिक्रिया दिली. “अमेरिकेनं आमच्या नागरिकांवर आणि सैनिकांवर भ्याड हल्ला केला होता. युद्ध छेडण्याचा आमचा हेतू नाही, परंतु आक्रमकतेनं आम्ही आमच्या देशाचं संरक्षण करू,” असंही त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा – मिसाइल स्ट्राइकनंतर अमेरिकेच्या विमानांना इराक, इराण, ओमानमधून उड्डाणांवर बंदी

इराक, इराणमधून अमेरिकन विमाने उड्डाण करणार ?
अमेरिकन फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने इराण, इराक, ओमान आणि इराण-सौदी अरेबियाच्या सागरी हद्दीतून अमेरिकन प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून FAA कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.