उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित यमुना एक्स्प्रेस वेवरील चार महिलांवरील सामूहिक बलात्कारप्रकरणातील नराधमांना अखेर दोन महिन्यांनी अटक करण्यात यश आले आहे. चकमकीनंतर पोलिसांनी चार नराधमांना अटक केली असून दोन जण चकमकीतून पळ काढण्यात यशस्वी झाले. सर्व नराधम उत्तर प्रदेशमधील बावरिया या टोळीशी संबंधीत असल्याची माहिती समोर आली आहे.

मे महिन्यात उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशभरात खळबळ माजली होती. ग्रेटर नोएडातील एका कुटुंबातील सात जण कारमधून जेवर येथून बुलंदशहर येथे जाण्यासाठी निघाले होते. बुलंदशहरमध्ये रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नातेवाईकाची भेट घेण्यासाठी ते निघाले होते. साबौताजवळ टायर पंक्चर झाल्याने कार थांबवावी लागली. यादरम्यान सहा ते सात जणांनी त्यांच्या कारला घेरले आणि बंदुकीचा धाक दाखवून कारमधील मंडळींकडे असलेले मौल्यवान दागिने आणि मोबाईल फोन हिसकावून घेतले. दरोडेखोर त्यावरच थांबले नाही. त्यांनी कारमधील चार महिलांना महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलांना फरफटत नेत असताना कुटुंबातील एका व्यक्तीने विरोध करण्याचा प्रयत्नही केला. पण दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि या त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

महामार्गावर चार महिलांवर सामूहिक बलात्कार आणि एकाची हत्या झाल्याने उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर चोहोबाजूंनी टीका सुरु झाली होती. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा संतप्त सवाल सरकारला विचारला जात होता. दोन महिने होत आले तरी बलात्कार करणाऱ्या नराधमांना अटक करण्यात अपयश येत असल्याने पोलिसांवर टीका सुरु झाली होती. शेवटी शनिवारी रात्री पोलिसांना या नराधमांविषयी माहिती मिळाली. कारवाईसाठी गेले असता नराधमांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. या कारवाईत सहा पैकी चार जण जखमी झाले. तर उर्वरित दोघांनी पळ काढला. हे सर्व जण बावरिया या टोळीतील दरोडेखोर असल्याचे समोर आले आहे. जखमींवर दिल्लीतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजू, राकेश, जय सिंह आणि दीपक अशी या नराधमांची नावे आहेत. पीडित कुटुंबाने पोलिसांच्या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. दोन महिन्यानंतर आम्हाला शेवटी न्याय मिळाला, आता या नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाने केली.