गुजरातमधल्या बेने इस्त्रायली अर्थात ज्यू समुदायाला अल्पसंख्याक असा दर्जा मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी घोषित केला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही अत्यल्प प्रमाणात ज्यूंची संख्या आहे. रुपानी सध्या इस्त्रायलच्या दौऱ्यावर असून पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या भेटीनंतर त्यांनी ही घोषणा केली. गुजरातमधल्या ज्यूंची ही गेल्या अनेक दशकांची ही मागणी होती. गुजरातमध्ये 168 ज्यू असून त्यातले 140 जण अहमदाबादमध्ये स्थायिक आहेत, जे मेगन अब्राहम सिनेगॉगमध्ये एकत्र आले आणि त्यांनी ही बातमी आनंदानं साजरी केली.

अत्यल्प संख्येनं असल्यामुळे ज्यूंची 2011 च्या शिरगणतीत वेगळी नोंदही करण्यात आली नव्हती. अन्य सदरातील 16,480 लोकांमध्ये ज्यूंचा समावेश करण्यात आला होता. मेगन अब्राहम सिनेगॉगचे अविव दिवेकर यांनी सांगितले की, “अन्य कशापेक्षाही ज्यूंच्या मालमत्तांचे हक्क त्यांना मिळतिस हे महत्त्वाचं आहे.सिनेगॉगना जरी सुरक्षा लाभलेली असली तरी आता या दर्जामुळे समुदायातील अन्य मालमत्तांनाही आता संरक्षण मिळेल.”
गेल्या वर्षी गुजरात सरकारकडे औपचारिकरीत्या अल्पसंख्याक दर्जा मिळावा अशी मागणी समुदायाकडून करण्यात आली होती. ज्यावेळी जानेवारी 2018मध्ये इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू भारताच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी यास चालना मिळाली.

इस्थर डेव्हिड या साहित्य अकादमी विजेत्यांनी सांगितलं की ही खूप जुनी मागणी होती आणि यामुळे अत्यल्पसंख्य असलेल्या ज्यूंना आता सुरक्षित वाटणार आहे. आमचीपण दखल घेतली गेली अशी भावना निर्माण होईल असे ते म्हणाले. विजय रुपाणींना आम्ही भेटलो होतो आणि आमची मागणी सांगितली होती असे दिवेकर म्हणाले. गुजरातमध्ये एकूण 170 ज्यू असून त्यातले 140 अहमदाबादमध्ये राहतात असे दिवेकर म्हणाले.