झारखंड विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी हिंसाचाराचे गालबोट लागले. या टप्प्यात २० मतदारसंघांत ६३.३६ टक्के मतदान झाले. सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. सुरक्षारक्षकांकडून शस्त्र पळवून नेण्याचा प्रयत्न करताना जवानांनी गोळीबार केला त्यात एक जण ठार झाला.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानात मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या पूर्व जमशेदपूर मतदारसंघाचा समावेश आहे. येथे दास यांचा सामना त्यांचे मंत्रिमंडळातील एकेकाळचे सहकारी शरयू रॉय यांच्याशी आहे. दुसऱ्या टप्प्यात ६ हजार ६६ मतदान केंद्रांवर मतदान झाले. त्यातील ७६२ केंद्रे ही नक्षलभागातील आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात १२ डिसेंबरला मतदान होईल. राज्यात एकूण पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. २३ डिसेंबरला मतमोजणी होईल. सकाळी सात वाजता मतदान सुरु झाले. सिसाई मतदारसंघात जलद कृती दलाने केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. या घटनेची चौकशी सुरु आहे. या घटनेत एक पोलीस अधिकारी जखमी झाला.