Jharkhand Election Results 2019 LIVE Updates : झारखंड विधानसभेच्या  निवडणुकीची  मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार असले तरी सुरूवातीच्या कलामध्ये भाजपा पिछाडीवर आहे. राज्यातील ८१ जागांसाठीच्या प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. एकूण पाच टप्प्यात मतदान झाले. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपला धक्का बसेल असा अंदाज वर्तवलेला आहे.

Live Blog

Jharkhand Election Results 2019 LIVE Updates : काँग्रेस, जेएमएम आणि राजदची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल...  झारखंड निवडणुकीचे निकाल इतर भाषांमध्येही Hindi, English, Tamil, Malayalam, Bangla

17:17 (IST)23 Dec 2019
इतर राज्यांमध्येही जनताच भाजपाला धडा शिकवेल -शरद पवार

"आत्ताचे सत्ताधारी परिस्थिती चिघळेल अशी भूमिका घेताना दिसत आहेत. महाराष्ट्रातून रस्ता मिळाला, त्यातूनच झारखंडमध्ये भाजपाच्या विरोधात सगळे एकत्र आले. झारखंड विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला धडा शिकवला. इतर राज्यांमध्येही संधी मिळाल्यानंतर जनताच भाजपाला धडा शिकवेल," असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यक्त केले.

16:21 (IST)23 Dec 2019
झारखंड निवडणूक निकाल : भाजपाला डबल धक्का; पराभवाबरोबर दुप्पट जागाही घटल्या

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला डबल धक्का बसला आहे. सत्तेतून पायउतार व्हाव्या लागणाऱ्या भाजपाच्या जागाही दुपटीनं घटल्या आहेत. दुपारपर्यंत ३१ जागांवर आघाडीवर असलेली भाजपा अखेरच्या काही फेऱ्या बाकी असताना २३ मतदारसंघातच आघाडीवर आहे. तर काँग्रेस, जेएमएम आणि राजदला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल ४७ जागांवर तिन्ही पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.

14:28 (IST)23 Dec 2019
विधानसभा निवडणूक निकाल : भाजपाचा आकडा वाढला, पण बहुमत काँग्रेस-जेएमएमकडेच

झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल विविध एक्झिट पोलप्रमाणेच लागले आहेत. सत्तांतर होणार असल्याचा अंदाज बहुतांश पोलनं व्यक्त केला होता. तसंच चित्र असून, काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीनं बहुमतापर्यंत मजल मारली आहे. मतमोजणीदरम्यान मधल्या काही  भाजपाची घसरण झाली होती. २७ जागांवरच भाजपाचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र, काही दिलासा भाजपाला मिळाला असून, ३१ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेस-जेएमएम ४० जागांवर आघाडीवर आहे. यात जेएमएम २३, काँग्रेस १३ आणि राजद ४ जागांवर आघाडीवर आहे.

13:40 (IST)23 Dec 2019
झारखंड निवडणूक निकाल : काँग्रेस-जेएमएम आघाडीचं सरकार; ४२ जागांवर आघाडी

झारखंड विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले नसले तरी सत्तेच चित्र स्पष्ट झाल आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत ४३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाची यावेळी घसरण झाली आहे. भाजपा केवळ ३० जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस-जेएमएम आणि राजद आघाडीला जनतेनं कौल दिला आहे. काँग्रेस-जेएमएम आघाडी ४२ जागांवर आघाडीवर आहे. झारखंड विधानसभेची संख्या ८१ असून, बहुमतासाठी ४१ आमदारांची गरज आहे.

13:00 (IST)23 Dec 2019
झारखंड निवडणूक निकाल : "राज्यांना गृहित धरू नका, हाच झारखंड निकालाचा संदेश"

झारखंड विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, सत्तेत असलेल्या भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपा २९ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस-जेएमएमनं बहुमताचा आकडा पार केला आहे.  झारखंड निकालावर काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपावर टीका केली आहे. "लोकसभेत जनतेनं भाजपाला निवडून दिलं. मात्र, मोदी त्यांच्याच मनातील बात करत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना स्वतःच्या मनातील बात ऐकवली आहे. राज्यांना गृहित धरू नका, असाच संदेश झारखंड निवडणुकीच्या निकालानं दिला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस सरकार बनवणार आहे," असा दावाही सातव यांनी यावेळी केला.

12:17 (IST)23 Dec 2019
झारखंडमध्ये घड्याळाचा गजर होणार? राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर

झारखंडमध्येही राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते कमलेश कुमार तिवारी हे हुसैनबाद विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय जनता दलाचे संजय कुमार सिंग यादव, आपचे कन्हैया विश्वकर्मा हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

11:10 (IST)23 Dec 2019
विधानसभा निवडणूक निकाल : भाजपाची घसरगुंडी, काँग्रेस-जेएमएम आघाडी पन्नाशीकडे

झारखंडमधून भाजपा सत्तेतून पाय उतार व्हावे लागणार असल्याचेच निवडणूक निकालाच्या कलातून दिसत आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काँग्रेस-जेएमएम आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई काळ दिसत होती. मात्र, काही मतमोजणीच्या फेऱ्या झाल्यानंतर ३२ जागांवर आघाडी घेतलेल्या भाजपाची घसरगुंडी उडाली आहे. भाजपा २७ जागांवर तर काँग्रेस-जेएमएमची वाटचाल पन्नाशीकडं सुरू झाली असून, सध्या ४३ जागांवर आघाडी घेतली आहे.


10:29 (IST)23 Dec 2019
झारखंड निवडणूक निकाल : काँग्रेस-जेएमएमची पुन्हा सरशी; ४० जागांवर आघाडी

भाजपासह काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चासाठी महत्त्वाच्या असलेल्या झारखंड विधानसभेत सत्तांतराचे संकेत दिसत आहेत. ८१ जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस-जेएमएम आघाडीत अटीतटीची लढत सुरू होती. मात्र, साडेदहा वाजेनंतर चित्र पुन्हा पालटलं. काँग्रेस-जेएमएमनं पुन्हा मुसंडी मारली असून, ४० जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपाची घसरण झाली असून, ३२ जागांवर भाजपा आघाडीवर आहेत.

10:25 (IST)23 Dec 2019
झारखंड निवडणूक निकाल : हेमंत सोरेन हेच मुख्यमंत्री होणार आहे

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद ३८ जागांवर आघाडीवर असून, भाजपानं ३२ जागांवर आघाडी घेतली आहे. काही तासांत निकाल स्पष्ट होणार असून, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा सफाई होणार आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलो. सोरेन हेच झारखंडचे मुख्यमंत्री होणाह आहेत," असा दावा त्यांनी केला.

09:53 (IST)23 Dec 2019
मुख्यमंत्री रघुवर दास जमशेदपूर पूर्वमधून आघाडीवर

झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास हे जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे बंडखोर उमेदवार आणि माजी मंत्री सरयू रॉय हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसनं गौरव वल्लभ यांना उमेदवारी दिलेली आहे. दरम्यान, मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर काही फेऱ्यानंतर मुख्यमंत्री रघुवर दास आघाडीवर आहेत.

09:26 (IST)23 Dec 2019
काँग्रेस ३६, तर भाजपाची ३५ जागांवर आघाडी

मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये राज्यात सत्तेत असलेली भाजपा पिछाडीवर पडली होती. मात्र, नऊनंतर भाजपानं उभारी घेतलेली दिसत आहे. काँग्रेस आघाडी आणि भाजपा यांच्यात अटीतटीची लढत असल्याचे चित्र सध्या आहे. काँग्रेसनं ३६ जागांवर आघाडी घेतली असून, ३५ ठिकाणी भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत.


08:52 (IST)23 Dec 2019
भाजपाच्या हातून आणखी एक राज्य जाणार

झारखंड विधानसभेच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीच्या फेऱ्यानंतर कल काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चाच्या बाजूनं दिसत आहे. तर भाजपा पिछाडीवर पडली आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन हे दोन्ही मतदारसंघातून आघाडीवर आहेत. ते दुमका आणि बरहाट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

08:45 (IST)23 Dec 2019
भाजपाची प्रतिष्ठा पणाला

झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपानं प्रतिष्ठा पणाला लावली होती. राज्यातील सत्ता राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्येकी ९ सभा घेतल्या होत्या. दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चासोबत असलेल्या काँग्रेसनंही राज्यात लक्ष दिलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाच तसेच प्रियंका गांधी यांनी एक प्रचारसभा घेतली.