करोनाबाधितांचा आकडा दिवसोंदिवस वाढत असल्याने सर्व सामान्यांमध्ये चिेतेचे वातावरण आहे. करोनामुळे देशामध्ये रोज शेकडोच्या संख्येने रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र असं असतानाच झारखंडमधील धनबाद येथील कुटुंबासाठी करोनाची साथ आनंदाची बातमी घेऊन आली आहे. कौटुंबिक वादामुळे २० वर्षांपूर्वी घर सोडून गेलेली एक व्यक्ती करोनाच्या साथीमुळे पुन्हा घरी आली आहे.

धनबाद येथील झरियामध्ये हा प्रकार समोर आळा आहे. सत्य नारायण यादव याने वयाच्या ३५ व्या वर्षी घर सोडलं होतं. नुकताच तो वयाच्या ५५ व्या वर्षी पुन्हा घरी आला आहे. सन २००० साली एका कौटुंबिक वादानंतर रागाच्याभरात सत्य नारायण यांने घरातून पळ काढला. तो दुसऱ्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होता. मात्र सत्य नारायण नक्की कुठे आहे याबद्दल कुटुंबातील कोणाला काहीच माहिती नव्हती. सत्य नारायण बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती मात्र सत्य नारायण यांचा पत्ता लागला नव्हता, असं न्यूज १८ ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. आता तब्बल २० वर्षानंतर सत्य नारायण घरी परतल्याने कुटुंबाने समाधान व्यक्त केलं आहे.

घरातून पळून गेल्यानंतर सत्य नारायण यांनी पैसे कमवण्यासाठी वजन करण्याचं मशीन विकत घेऊन रस्त्याच्याकडेला बसू लागले. येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी कोणी वजन केलं तर सत्य नारायण यांना दिवसाला काही रुपये मिळायचे. मात्र मागील आठवड्यामध्ये सत्य नारायण यांची प्रकृती खूपच खालावली. ताप, सर्दी आणि खोकला असल्याने सत्य नारायण घरीच पडून होता. सत्य नारायणला होत असणारा त्रास हा करोनाच्या लक्षणांप्रमाणे असल्याने गावकरीही त्याच्या मदतीला आले नाहीत. करोनाच्या भीतीमुळे गावकऱ्यांनी सत्य नारायणकडे तुझे मूळ गाव कोणते, कोणी नातेवाईक आहेत का अशी चौकशी केली. मात्र सत्य नारायणने आपलं या जगात कोणीच नसल्याचं सांगितलं. गावकऱ्यांना सत्य नारायणसंदर्भात पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तातडीने या गोष्टीची दखल घेत सत्य नारायणच्या घराला भेट दिली. त्यांनी सत्य नारायणची कानउघाडणी केली. पोलिसांनी त्यांचं मूळ गाव आणि नातेवाईकांसंदर्भात चौकशी केली असता सत्य नारायणला रडू कोसळलं आणि त्याने खरी माहिती सांगितली.

“माझं खरं नाव सत्य नारायण नसून गजाधर सोनार असं आहे. मी २००० साली घरगुती वादानंतर घर सोडलं आणि झरियामधील लिलोरी पथरा येथे एकटाच रहायला आलो. माझं मूळ गाव हे कोडरमा जिल्ह्यातील बेलगढ झुमरी तलैया हे आहे. १९८५ ते २००० सालापर्यंत आपण इंटरप्राइजेस मेडिकलमध्ये काम करायचो. याच कालावधीमध्ये घरात एक मोठं भांडण झालं आणि मी घर सोडलं,” असं या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी यासंदर्भातील माहिती कोडरमा पोलीस स्थानकामध्ये कळवली. त्यानंतर या व्यक्तीची पत्नी अनिता देवी पुत्र चंदेश्वर ही लिलोरी पथरा येथे आली. आपल्या पतीची अवस्था पाहून अनिता देवीला रडू आलं. अनिता देवीने दिलेल्या माहितीनुसार पती बेपत्ता झाल्यानंतर तिने कोडरमा पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली होती. स्वत: या व्यक्तीच्या कुटुंबाने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. आता २ज वर्षानंतर पती सापडल्याने खूप समाधान वाटत असल्याचंही अनिता देवीने सांगितलं.