झारखंड झुंडबळीतील पीडित तरबेज अन्सारी यांच्या पत्नीने आरोपींवर हत्येच्या गुन्हा लावण्यात आला नाही तर आत्महत्या करु अशी धमकी झारखंड पोलिसांना दिली आहे. शहिस्ता परवीन यांनी रांचीचे पोलीस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींवर लावण्यात आलेलं कलम ३०४ काढून ३०२ लावण्यात यावं अशी मागणी केली. जर मागणी पूर्ण झाली नाही तर आपण पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर आत्महत्या करु अशी धमकी त्यांनी यावेळी दिली.

शहिस्ता परवीन आपली आई आणि सासऱ्यांना सोबत घेऊन अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. “सर्व जगाने माझ्या पतीची हत्या होताना पाहिलं. तरीही माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. जर त्यांच्यावर हत्येचा गुन्हा लावण्यात आला नाही तर मी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर आत्महत्या करेन,” असं शहिस्ता परवीन यांनी सांगितलं आहे.

शहिस्ता आणि तरबेज यांच्या लग्नाला फक्त दोनच महिने झाले होते. १७ जून रोजी तरबेज अन्सारी यांच्यावर जमावाने हल्ला केला होता. २२ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूच्या दोन दिवसांनी शहिस्ता यांना आपण गरोदर असल्याचं लक्षात आलं. पण पतीच्या मृत्यूमुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे त्यांना आपण बाळ गमवावं लागलं.

पोलिसांकडून सर्व ११ आरोपींवरील हत्येचा गु्न्हा रद्द

झारखंड पोलिसांनी या मारहाण प्रकरणातील सर्व ११ आरोपींवरील हत्येचे ३०२ कलम हटवले आहे. शवविच्छेदन अहवालात तबरेजचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाल्याने आरोपींवरील हत्येचा कलम हटवण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?
तबरेज अन्सारी या २२ वर्षीय तरुणाला दुचाकी चोरीच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आली होती. यावेळी त्याला जमावाने जबरदस्तीने जय श्रीराम, जय हनुमान म्हणण्यासही भाग पाडले होते. या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, यामध्ये जमावाने तबरेजला एका खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याचे चित्रीत झाले होते. दरम्यान, पोलिसांनी तबरेजला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्याची प्रकृती बिघडत गेली आणि २२ जून रोजी त्याचा मृत्यू झाला होता.