झारखंडमध्ये विधानसभेच्या २० जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात जाली आहे. २० जागांसाठी तब्बल २६० उमेदवार रिंगणात उतरले आहे. सर्वच मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. ४२ हजार जवान दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी तैनात करण्यात आले आहेत. अशातच नक्षलग्रस्त भागांमध्येही मोठ्या प्रमाणात जवान तैनात करण्यात आले आहेत. अशातच एका मतदान केंद्रावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.

गुमला जिल्ह्यातील सिसई विधानसभा क्षेत्रातील एका मतदान केंद्रावर पोलीस आणि मतदारांमध्ये वाद झाले. यानंतर या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यादरम्यान पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका गावकऱ्याच्या मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. याव्यतिरिक्त या घटनेत एक पोलीस अधिकारी, तसंच एक पत्रकारही जखमी झाला आहे. सर्वांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलिसांनी आसपासचा परिसर सील केला असून सीआरपीएफच्या तुकडीलाही पाचारण करण्यात आलं आहे. मतदानादरम्यान काही नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची माहीत गुमलाच्या पोलीस प्रमुखांनी दिली.