झारखंडमध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी गुरुवारी मतदान होणार असून ज्येष्ठ पत्रकार एम. जे. अकबर आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे हाजी हुसेन अन्सारी यांच्यात सरळ लढत होणार आहे.
जेव्हीएम(पी) पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असली तरी त्यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या पाठिंब्याने विजयी झालेले उमेदवार के. डी. सिंह यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला त्यामुळे ही निवडणूक होत आहे. पुढील वर्षी त्यांची मुदत संपुष्टात येत होती. नवीन जयस्वाल, अमरकुमार बौरी, गणेश गंजू, आलोककुमार चौरसिया, रणधीरकुमार सिंह आणि जानकी यादव हे सहा आमदार जेव्हीएम(पी) पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.