तीन दिवस जेवणच न मिळाल्याने ५९ वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला. भूकबळी जाणे ही सामाजिकदृष्ट्या निश्चितच निंदनीय बाब आहे. मात्र हा धक्कादायक प्रकार रविवारीच समोर आला आहे. झारखंडमध्ये रविवारी सावित्री देवी या महिलेचा मृत्यू अन्न न मिळाल्याने झाला आहे. एएनआयने या संदर्भातली माहिती दिली आहे. डुमरीच्या एमओ शीतल प्रसाद यांनी सांगितले की प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचे रेशन कार्डही तयार झालेले नव्हते. त्यामुळे या महिलेला रेशन दुकानावरचे धान्य मिळू शकले नाही दुर्दैवाने या महिलेचा मृत्यू झाला. या संदर्भात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे प्रसाद यांनी म्हटले आहे.

सावित्री देवी यांचे रेशन कार्ड तयार व्हावे यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले, मात्र प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप सावित्री देवी यांची सून सरस्वती देवीने केला. सावित्री देवी यांची दोन मुले बाहेर काम करतात, कसाबसा आमचा उदरनिर्वाह चालतो. अशात सावित्री देवी यांना मागील ३ दिवसांपासून अन्न मिळाले नाही त्याचमुळे अन्न न मिळाल्याने तडफडून त्यांचा मृत्यू झाला असे त्यांच्या सुनेने म्हटले आहे. आमच्या संपूर्ण कुटुंबावर भूकेने तडफडायचीच वेळ आली आहे. काही दिवसांपासून तर आम्ही भीक मागून आमचे पोट भरत आहोत असेही सरस्वती देवीने सांगितले.

भूकेने तडफडून महिलेचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे असे डुमरीचे आमदार जागरनाथ महतो यांनी म्हटले आहे. तसेच अधिकाऱ्यांनी जो निष्काळजीपणा दाखवला त्यामुळेच या महिलेचा मृत्यू झाला असे महतो यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा आपण विधानसभेतही उचलून धरणार आहोत असेही त्यांनी सांगितले.