21 March 2019

News Flash

झारखंडमध्ये म्हशी चोरणाऱ्या दोघांची ठेचून हत्या

गोड्डा जिल्ह्यातील देवबंद व सुंदर पहारी या भागांच्या सीमेवरील बनकट्टी गावात ही घटना घडली. बुधवारी सकाळी एक टोळी म्हशी चोरण्यासाठी देवबंद गावात पोहोचली.

जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या दोघांवर यापू्र्वी म्हशी चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. (प्रतिकात्मक छायाचित्र)

झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात म्हशी चोरणाऱ्या टोळीतील दोघांची जमावाने हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून म्हशी चोरल्याप्रकरणीही पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या दोघांवर यापूर्वी म्हशी चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

गोड्डा जिल्ह्यातील देवबंद व सुंदर पहारी या भागांच्या सीमेवरील बनकट्टी गावात ही घटना घडली. बुधवारी सकाळी एक टोळी म्हशी चोरण्यासाठी देवबंद गावात पोहोचली. तिथून जवळपास १२ म्हशी चोरुन ही टोळी पळ काढत होती. देवबंदपासून २- ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या बनकट्टी गावात ही टोळी पोहोचली असता ग्रामस्थांनी त्यांना पकडले. यादरम्यान बनकट्टी गावातील ग्रामस्थही तिथे पोहोचले. यानंतर जमावाने म्हशी चोरणाऱ्यांना बेदम मारहाण केली. पाच चोरट्यांपैकी तीन जणांनी तिथून पळ काढला. तर दोन जण जमावाच्या तावडीत सापडले. या दोघांचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे गोड्डाचे पोलीस अधीक्षक राजीव रंजन सिंह यांनी सांगितले.

मुमतझा अन्सारी आणि छकरू अन्सारी अशी या मृत्यू झालेल्यांची नावे असून ते बांझी गावात राहत होते. घटनास्थळापासून हे गाव ३० ते ४० किलोमीटर अंतरावर आहे. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. दोघांवर यापूर्वी म्हशी चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

First Published on June 14, 2018 1:15 am

Web Title: jharkhand two people lynched for stealing cattle in godda four arrested