गुजरात म्हणजे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला. गेली २२ वर्षे भाजपची एकहाती सत्ता गुजरातेत आहे. सोमवारी जाहीर झालेल्या गुजरात विधानसभा निवडणूक निकालांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. मागील निवडणुकांपेक्षा यावेळी काँग्रेसच्याही जागा वाढल्या. मात्र, या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधले ते हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांचे नव्याने उदयास आलेले जातीनिहाय नेतृत्व. अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या दोन्ही तरुण नेतृत्वाचा या निवडणुकीत विजय झाला.

जिग्नेश मेवाणी-
वडगाव मतदारसंघातून जिग्नेशने निवडणूक लढवली आणि १९६९६ मतांच्या फरकाने तो जिंकला. भाजपच्या विक्रमकुमार चक्रवर्तीचा त्याने पराभव केला. उनामधील दलित मारहाण प्रकरण देशव्यापी आंदोलन करण्यामध्ये ३६ वर्षीय जिग्नेशचा मोठा हातभार होता. दलितांचा नेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. भाजपच्या विजय चक्रवर्तीचा त्याने पराभव केला. वडगाव मतदारसंघात काँग्रेसने एकही उमेदवार उभा न करता जिग्नेशला अप्रत्यक्ष पाठिंबा जाहीर केलेला. भाजपने त्याच्याविरोधात बरीच मेहनत घेतली असली तरी गुजरातच्या जनतेने या तरुण नेतृत्वाला पाठिंबा दिला हे निकालांमधून स्पष्ट झाले.

वाचा : क्रोधाशी कडवी झुंज देत काँग्रेसने स्वाभिमान जपला- राहुल गांधी

अल्पेश ठाकोर-
अल्पेश ठाकोर मूळ काँग्रेसचाच. त्याचे वडील काँग्रसचे जिल्हाध्यक्ष. ३९ वर्षीय अल्पेशने विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याने काँग्रेसच्या तिकिटावर राधनपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. १४,८५७ मतांच्या फरकाने त्याने ही निवडणूक जिंकली.