जनरल बिपीन रावत यांनी बुधवारी संरक्षण प्रमुखपदाची (चीफ ऑफ डिफेन्स) सूत्रे घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावत यांचं अभिनंदन केलं. मोदी यांनी ट्विट करून रावत यांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांच्या ट्विटवर आमदार जिग्नेश मेवानी यांनी प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.

लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाल्यानंतर जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बुधवारी पदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून रावत यांचे अभिनंदन केले. “आपण नव्या वर्षाची आणि दशकाची सुरूवात करत आहोत आणि जनरल बिपीन रावत यांच्या रुपाने भारताला पहिले संरक्षण प्रमुख मिळाले आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देतो. ते एक उत्तम अधिकारी असून, त्यांनी प्रचंड उत्साहानं देशाची सेवा केली आहे. पहिले संरक्षण प्रमुख शपथ घेत असताना मी देशाची सेवा करणाऱ्या आणि शहीद झालेल्या सर्वांना अभिवादन करतो. कारगिल युद्धांमध्ये लढलेल्या जवानांचं स्मरण करतो. अनेक चर्चांनंतर लष्करात बदल होत आहे,” असं ट्विट मोदी यांनी केलं होतं.

गुजरात विधानसभेचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी मोदी यांचं ट्विटवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे. जिग्नेश मेवानी म्हणाले, “आसाममधील मोहम्मद साना उलाह कारगिल युद्धात उत्तम कामगिरी केली. या कामगिरीबद्दल त्यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मानही करण्यात आला. पण, आता त्यांना आसामचे रहिवाशी नसल्याचं घोषित करून डिटेंशन कॅम्पमध्ये (स्थानबद्धता केंद्र) पाठवण्यात आलं आहे. मोदी सरकार आणि त्यांचे नवे संरक्षण प्रमुख या जवानांचं सरंक्षण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. आता त्यांची अशी इच्छा आहे की, ते (सरकार) आपल्या जवानांची काळजी घेत आहेत, यावर जनतेने विश्वास ठेवावा,” अशी टीका मेवानी यांनी केली आहे.