पश्चिम आफ्रि केतील माली देशाची राजधानी बामको येथे एका अमेरिकी हॉटेलमध्ये केलेल्या हल्ल्याची जबाबदारी अल्जेरियाच्या अल मुराबीतौन या जिहादी गटाने घेतली असून मोख्तार बेलमोख्तार हा या गटाचा म्होरक्या असून तो एकाक्ष आहे. उत्तर आफ्रिका भागातील अल काईदाचा गट म्हणून प्रसिद्ध असलेल्या अल मुराबीतौनची स्थापना २०१३ मध्ये झाली होती. अल काईदाचा सिग्नेटरीज इन ब्लड व मुजाओ या दोन गटांचे एकत्रीकरण करून हा जिहादी गट तयार करण्यात आला असून त्यांनी २०१२ मध्ये उत्तर मालीचा ताबा घेतला होता.
कतार येथील ‘अल जझीरा’ वाहिनीने एक ध्वनिफीत जाहीर केली असून त्यात या गटाने मालीत बामको येथे असलेल्या रॅडिसन ब्लू हॉटेलमधील हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे, या हल्ल्यात २७ जण मरण पावले होते. फ्रान्सचे संरक्षणमंत्री जीन युवेस ले ड्रायन यांनी सांगितले, की हाच गट या हल्ल्यामागे असण्याची शक्यता अधिक आहे. बेलमोख्तर हा अल काईदाचा मघरेबमधील नेता असून त्याला अनेक वेळा मृत घोषित करण्यात आले. जून व एप्रिल २०१३ मध्ये तो मेल्याचे सांगण्यात आले पण तो अजून जिवंत आहे. त्याच गटाच्या एका नेत्याने आपण आयसिसशी बांधील असल्याचे सांगितले. बेलमोख्तर याचे टोपण नाव द अनकॅचेबल असून तो मि.मार्लबोरो म्हणूनही ओळखला जातो.