ज्यांच्यासाठी पराभव अटळ आहे, ते निवडणूक आयोगावर हरप्रकारे टीका करीत आहेत, अशा शब्दांत भाजपने आज काँग्रेसवर पलटवार केला आहे. द्राक्षे आंबट असल्याने त्यांना खाता येत नसल्यानेच ते अशा उचापती करीत असल्याचा टोला त्यांनी हाणला. भाजप नेते भुपेंद्र यादव यांनी माध्यमांसमोर बोलताना काँग्रेसवर टीका केली.


गुजरातमध्ये यापूर्वी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडली होती. त्यावेळी काँग्रेसने निवडणूक आयोगाला निष्पक्ष असल्याचे म्हटले होते. कारण ही निवडणूक त्यांच्या पारड्यात होती. त्यावेळी आम्ही आयोगाचा हा निर्णय मान्य केला होता. मात्र, आजची निवडणूक त्यांना कठीण वाटत असल्यानेच ते निवडणूक आयोगावर विविध प्रकारे आरोप करीत असल्याचे यादव म्हणाले.


गुजरातमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी मतदान केले. त्यानंतर त्यांनी छोटासा रोड शो ही केला. मोदींनी कारच्या फुटबॉर्डवर उभे राहून लोकांना अभिवादन केले. त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती. यावेळी भाजपचे झेंडेही फडकताना दिसत होते.

यावरुन टीका करताना काँग्रेसने मोदींची ही कृती आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत काँग्रेस नेते सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली होती. मोदींनी ३०० मीटरपेक्षा पुढे जाऊन आचारसंहिता मोडल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला होता. त्याचबरोबर भाजपने विमानतळावर घेतलेल्या पत्रकार परिषदेवरही काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले असल्याची टीका केली होती.