रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारतचा दाखला देत जिओची वाटचाल याच दिशेने सुरु असल्याचे सांगितले आहे. या सभेमध्ये अंबांनींनी लवकरच संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करुन देशांतर्गत सेवा पुरवण्याबरोबरच जगभरामध्ये डिजिटल तंत्रज्ञान निर्यात करण्याची क्षमता जिओमध्ये असल्याचे सांगितले. तसेच हे उद्दिष्ट्य साध्य करण्याचं लक्ष्य आम्ही डोळ्यासमोर ठेवले असल्याची माहिती अंबानी यांनी गुंतवणुकदारांना संबोधित करताना दिली आहे.

नक्की पाहा >> Jio Glass : जाणून घ्या फिचर्स, किंमत आणि कधीपासून होणार उपलब्ध

पूर्णपणे भारतीय फाइव्ह जी नेटवर्क

जिओने पूर्णपणे भारतीय फाइव्हजी नेटवर्क तंत्रज्ञान तयार केल्याची माहिती अंबानी यांनी दिली. जिओचं तंत्रज्ञान शून्यापासून निर्माण केलं असून १०० टक्के भारतीय आहे. संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान असलेलं हे फाइव्ह जी नेटवर्क पुढील वर्षात भारतात लाॅंच करणार असल्याची माहिती अंबानी यांनी दिली. फाइव्ह जीचे स्पेक्ट्रमचं वाटप करण्यास सुरुवात झाल्यानंतर पुढील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये हे तंत्रज्ञान देशामध्ये लाँच करण्यासाठी जिओ पूर्णपणे सज्ज आहे असं अंबानींनी सांगितलं. हे तंत्रज्ञान केवळ भारतासाठीच निर्माण करण्यात येणार नसून ते जगभरातील इतर देशांमध्येही निर्णयात केलं जाणार असल्याचंही अंबानी यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >>
 रिलायन्सने लाँच केली Jio Glass ची सेवा; डिजीटल शिक्षणासाठी होणार फायदा

मोदी काय म्हणाले होते?

मे महिन्यामध्ये १२ तारखेला देशाला उद्देशून केल्या भाषणामध्ये मोदींनी स्वावलंबी भारत हेच आपलं उद्दिष्ट असल्याचं म्हटलं होतं. “संपूर्ण जग २१ वं शतक भारताचं असेल असं सांगत होतं. आपण गेल्या शतकापासून २१ वं शतक भारताचं असल्याचं ऐकत आहोत. करोना संकटानंतरही जगात जी स्थिती निर्माण होत आहे ती आपण पाहत आहोत. २१ वं शतक भारताचं व्हावं हे आपलं स्वप्न नाही तर जबाबदारीही आहे. जगाची आजची स्थिती पाहता त्यासाठी स्वावलंबी भारत हाच एकमेव मार्ग आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होत. “भारत जेव्हा स्वावलंबी होण्याबद्दल बोलतो तेव्हा आत्मकेंद्रीत व्यवस्थेबद्दल सांगत नाही. संसाराचं सुख, मदत आणि शांतीची चिंता दर्शवतो. भारताच्या विकासात नेहमी विश्वाची चिंता दिसली आहे. भारताच्या कामाचा प्रभाव विश्वावर पडतो,” असंही मोदींनी सांगितलं होतं. याच भाषणामध्ये त्यांनी आत्मनिर्भर भारत होण्यासाठी स्थानिक गोष्टींना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं होतं.