प्रस्तावित असलेली जिओ इन्स्टिट्युट शैक्षणिक शुल्क व हॉस्टेलची फी या माध्यमातून 1000 विद्यार्थ्यांकडून 100 कोटी रुपयांचे उत्पन्न पहिल्याच वर्षी मिळवेल अशी अपेक्षा रिलायन्स फाउंडेशनने व्यक्त केली आहे. सरकारकडे सादर केलेल्या अर्जामध्ये रिलायन्सने ही माहिती दिली आहे.

सध्या कागदावरच असलेली ही प्रस्तावित शैक्षणिक संस्था असून आताच तिला आयआयटीच्या तोडीचा प्रतिष्ठित संस्थेचा दर्जा मिळालेला आहे. तीन वर्षांनंतर या संस्थेची पहिली प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जिओ इन्स्टिट्युट पहिल्या वर्षी स्कॉलरशिपच्या माध्यमातून 38 कोटी रुपये माफ करणार असून त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याची सुमारे 6.2 लाख रुपयांची बचत होणार आहे. गेल्या वर्षी बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने 13,758 विद्यार्थ्यांकडून एकूण मिऴून 467 कोटी रुपये शुल्क मिळवले होते. पिलानी, गोवा, हैदराबाद व दुबई अशा चार ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत. त्यामुळे प्रति विद्यार्थी सुमारे 3.39 लाख रुपये इतके उत्पन्न या संस्थेने मिळवले होते. सरकारकडे प्रतिष्ठित संस्थेचा दर्जा मिळावा असा अर्ज करताना बीआयएसटीने विद्यार्थ्यांची संख्या 2021-22 पर्यंत 18 हजार इतकी वाढवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी प्रति विद्यार्थी 4.94 लाख रुपयांचे शुल्क अपेक्षित असून एकूण उत्पन्न 890 कोटी रुपये अपेक्षित आहे.

रिलायन्सच्या प्रस्तावानुसार जिओ इन्स्टिट्युट पहिल्या वर्षी नॅचरल सायन्ससाठी सगऴ्यात जास्त म्हणजे 300 जागा भरणार असून अभियांत्रिकीच्या 250, ह्युमॅनिटीच्या 200, मॅनेजमेंटच्या 125, कायद्याच्या 90, पत्रकारितेच्या 60, परफॉर्मिंग आर्ट्सच्या 50, स्पोर्ट्स सायन्सच्या 80 व अर्बन प्लॅनिंग व आर्किटेक्चरच्या 50 जागा भरणार आहे. पहिल्या वर्षी 154 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी 93 कोटी रुपये पगार व कर्मचाऱ्यांवर होणार आहे. जगातल्या टॉपच्या 500 विद्यापीठांमधून प्राध्यापकांना नियुक्त करण्यात येणार आहे असे रिलायन्स फाउंडेशनने म्हटले आहे.

भविष्यात मोठ्या प्रमाणात विस्तार अपेक्षित असून 15व्या वर्षी 10 हजार विद्यार्थी असतील व निव्वळ उत्पन्न 1502 कोटी रुपये असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. रिलायन्स फाउंडेशन 9,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून मुंबईजवळील कर्जत येथे 800 एकरांमध्ये ही संस्था उभारली जाणार आहे.