विधानसभेत शक्तीपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी शुक्रवारी सकाळी बिहारच्या राज्यपालांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. मांझी यांच्या राजीनाम्यामुळे बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेले राजकीय वादळ शमले असून, जनता दल युनायटेडचे नेते नितीशकुमार यांचा पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी मांझी यांना पक्षातून काढून टाकल्यामुळे त्यांना विधानसभेतील ‘असंलग्न सदस्य’ घोषित करण्यात आले होते. राज्यपालांच्या निर्देशानुसार मांझी यांना शुक्रवारी सभागृहात बहुमत सिद्ध करायचे होते. त्यासाठी एकच दिवस उरला असताना विधानसभेचे अध्यक्ष उदयनारायण चौधरी यांनी भाजपऐवजी जनता दल (यू)ला विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मान्यता दिली. भाजपचे नंदकिशोर यादव यांच्या जागी त्यांनी जनता दलाचे विजय चौधरी यांना विरोधी पक्षनेत्याचा दर्जा दिला. जद (यू)ला विधान परिषदेतही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आल्याचे सभापती अवधेश नारायण सिंग यांनी सांगितले. या सर्व पार्श्वभूमीवर बिहारमधील भाजपच्या विधीमंडळ पक्षाने मांझी यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपच्या समर्थनानंतरही विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी आवश्यक सदस्यबळ मांझी यांच्याकडे नव्हते. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा देऊन विधानसभेत स्वतःची नामुष्की होण्यापासून सुटका करून घेतली.