भारतीय सैन्यातील मेजर असल्याची बतावणी करत फोन करणा-या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिका-याला बंदोबस्ताची माहिती देणे जम्मू काश्मीरमधील पोलीस अधिका-याला महागात पडले आहे. जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी त्या अधिका-यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

जम्मू काश्मीरमधील बातामालू येथील सशस्त्र पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक तन्वीर अहमद हे कार्यरत आहेत. २० ऑगस्ट रोजी ते नियंत्रण कक्षात ड्यूटीवर होते. या दरम्यान पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या एका अधिका-याने नियंत्रण कक्षात फोन केला. काश्मीर खो-यातील दंगलीच्या पार्श्वभूमीवर आयएसआयच्या अधिका-याने अहमद यांना फोनवर मी मेजर संजीव बोलतोय अशी थाप मारली. आयएसआयच्या अधिका-याने अहमद यांच्याकडून काश्मीरमधील विविध भागात पाठवलेल्या बंदोबस्ताची माहिती घेतली. अहमद यांनीदेखील त्याच्यावर विश्वास दाखवत बंदोबस्ताची माहिती दिली.  बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यात १२ तुकड्या तैनात केल्याचे अहमद यांनी सांगितले. मग त्या अधिका-याने हंदवाडा आणि बंदीपोरमधील बंदोबस्ताची माहिती मागितली. अहमद यांनी माहिती घेतो असे सांगून फोन दुस-या अधिका-याकडे सोपवला. अहमद यांच्यासोबतच्या अधिका-याने काश्मीर खो-यात ४२ तुकड्या तैनात असल्याचे सांगितले. मग आयएसआयच्या अधिका-याने एक ईमेल आयडी दिला आणि त्यावर बंदोबस्ताची माहिती मेल करायला सांगितले. अहमद यांनी पाच मिनिटांत तुम्हाला मेल पाठवतो असे पाकिस्तानच्या अधिका-याला सांगितले.

केंद्रीय गृहमंत्रालयाने हा कॉल ट्रेस केला आणि काश्मीरमधील पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस महासंचालकांनी तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच अहमद यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात अहमद यांनी जाणीवपूर्वक माहिती दिलेली नाही असे निष्पन्न झाले आहे. पण या घटनेपासून धडा घेत आता नियंत्रण कक्षातील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांना अज्ञात व्यक्तींना फोन किंवा अन्य कोणत्याही स्वरुपात माहिती देऊ नका असे निर्देश देण्यात आले आहे.