जम्मू-पठाणकोट महामार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर आज (शनिवार) पहाटे पाचच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून हे दहशतवादी अधिकाऱ्यांच्या वसाहतीत शिरले आहेत. लष्कराने संपूर्ण परिसराला घेरले असून दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले असून एका चिमुकलीसह चौघेजण जखमी आहेत. याच मुद्यावरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ झाला. विधानसभाध्यक्ष कविंदर गुप्ता यांनी या हल्ल्याला रोहिंग्या मुसलमानांना जबाबदार ठरवले. गुप्ता यांनी रोहिंग्यांना याप्रकरणी जबाबदार ठरवल्यामुळे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने त्यांच्या माफीची मागणी केली. याचदरम्यान भाजपाच्या एका आमदाराने पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित करावे लागले.

सुरूवातीला सुंजवा लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आले तेव्हा एक हवालदार आणि त्याची चिमुकली मुलगी जखमी असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता एका जेसीओसह आणखी एक जवान या हल्ल्यात शहीद झाला आहे. इतर काहीजण ही जखमी आहेत. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार सुरक्षा संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती.

याप्रकरणावर गृहमंत्रालयही लक्ष ठेऊन आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरचे महासंचालक एस पी वैद्य यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांना या प्रकरणाची माहिती दिली. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ३ ते ४ दहशतवादी असल्याचे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांच्या वसाहतीला असलेले जाळीचे कुंपन तोडून या दहशतवाद्यांनी आत प्रवेश केला. भारतीय जवानांबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्याचे दहशतवाद्यांचे नियोजन होते. यापूर्वी ३१ डिसेंबर २०१७ रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा येथील सीआरपीएफच्या तळावर हल्ला केला होता. यात जैश ए मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते.