नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवस सबुरी ठेवा असे भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे जम्मू काश्मीरमध्ये नऊ वर्षाच्या मुलाला जीव गमवावा लागला. वाहचनालकाने जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने एका पित्याने त्याच्या मुलाला खांद्यावर घेऊन रात्रीच्या अंधारात घनदाट जंगलातून ३० किलोमीटरचे अंतर पायी कापले. मात्र सकाळी डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत त्या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता.

जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील डुंगा गावात २८ वर्षीय मोहम्मद हरुन आणि त्याचे कुटुंबीय राहतात. हरुन यांना ९ वर्षाचा मुलगा मुनीर हा दुसरीत शिकत असून १४ नोव्हेंबरपासून तो आजारी होता. मुलाच्या उपचारासाठी मन्सरला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथे जाण्यासाठी पैशांची गरज होती. हरुन यांच्याकडे २९ हजार रुपये होते. मात्र त्यामध्ये हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा होत्या. शेवटी हरुन यांनी ८ किलोमीटरची पायपीट करत खून गावातील जम्मू काश्मीर बँक गाठली. बँकेबाहेर रांग असल्याने तिथून ते रामकोटला गेले. तिथेही हरुन यांचा नंबर लागलाच नाही. शेवटी हताश होऊन हरुन घरी परतले.

१८ नोव्हेंबरला रात्री हरुन यांच्या  मुलाची प्रकृती खालावली. त्यांनी घरातील २९ हजार रुपये घेतले आणि मन्सरला जाण्यासाठी निघाले. ८ किलोमीटर पायी चालत हरुन खून गावातील मुख्य रस्त्यावर आले. तिथे मन्सरला जाण्यासाठी एक वाहनचालक तयार झाला. पण हरुन यांच्याकडील पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास त्या वाहनचालकाने नकार दिला. शेवटी पुन्हा एकदा हरुन यांनी मुलाला कडेवर घेतले आणि जंगलातून पायपीट करत मन्सर गाठले. मन्सरला डॉक्टरकडे पोहोचण्यास त्यांना सकाळचे पाच वाजले. रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी हरुन यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आणि हरुन कुटुंबीयांना मानसिक धक्काच बसला.

हरुन कुटुंबीयांवर ओढावलेल्या या प्रसंगाची अखेर प्रशासनानेही दखल घेतली आहे. सांबामधील जिल्हाधिकारी शीतल नंदा यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. तहसीलदार कुलदीपराज गोरान यांनी सोमवारी हरुन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचा जबाब घेतला. मी अजून अहवाल बघितलेला नाही, पण प्रथमदर्शनी नोटाबंदीच्या निर्णयामुळे हरुन यांच्या मुलाचा मृत्यू झालेला नाही असे दिसत असल्याचे शीतल नंदा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. तर नोटा बदलण्यासाठी हरुन ज्या दोन बँकेत गेले होते त्या बँकेचे शाखा व्यवस्थापक म्हणाले, हरुन यांनी त्यांची समस्या मांडली असती तर आम्ही तातडीने त्यांना नोटा बदलून देण्याची व्यवस्था केली असते. आम्ही दररोज रात्री १० पर्यंत काम करत आहोत असेही बँकेच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.