जम्मू-काश्मीर विधानसभेच्या हक्कभंग समितीने गुरुवारी माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांना समन्स बजावले आणि २२ जानेवारी रोजी स्वतःची बाजू मांडण्यासाठी समितीपुढे हजर व्हावे, असे निर्देश दिले.
जम्मू-काश्मीरमधील मंत्र्यांना लष्कराकडून पैसे दिले जात असल्याचा आरोप सिंग यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर विधानसभेत त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा ठराव मांडण्यात आला होता. हक्कभंग ठऱावावर सिंग यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्याला उत्तर देण्यासाठी सिंग उपस्थित झाले नाहीत. सभागृहाच्या अध्यक्षाना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपले आरोप फेटाळले. मात्र, समितीपुढे हजर न राहिल्याने त्यांच्याविरुद्ध समन्स बजावण्यात आले. हरियाणा पोलीसांच्या माध्यमातून हे समन्स बजावण्यात आले आहे.
समितीचे सदस्य देवेंदर राणा यांनी समितीकडे सिंग यांचे उत्तर आलेले नसल्याचे म्हटले आहे. समितीने त्यांना प्रत्यक्ष हजर होण्यास सांगितले होते. मात्र, ते आले नाहीत. त्यामुळेच समितीतील सर्व सदस्यांनी बहुमताने त्यांच्याविरुद्ध समन्स बजावण्याचा निर्णय घेतला, असे राणा म्हणाले.