जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी आज बारामुल्ला परिसरातील दुकानं पेटवून दिल्याप्रकरणी चार जणांना अटक केली. एसएसपी अब्दुल कय्यूम यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की, आरोपींची ओळख पटली आहे, मारूफ, आदिल, बिलाल और समीर अशी त्यांची नावं आहेत. २४ नोव्हेंबर रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेतील सहा दुकानं पेटवून देण्यात आली होती.

या अगोदर सप्टेंबर महिन्यात बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये पोलिसांनी काही संशयीत दहशतवाद्यांना अटक केली होती. ते बारामुल्लातील दुकानदारांना बाजारपेठ बंद करण्यासाठी धमकावत होते. तसेच परिसरात धमकी देणारे पोस्टर लावण्यासारख्या घटनांमध्येही त्यांचा सहभाग होता.

कलम ३७० हटवण्यात आल्यापासून पाकिस्तानसह दहशतवादी संघटना अधिकच चवताळेल्या आहेत. दहशतवाद्यांकडून जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. येथील स्थानिक व्यापाऱ्याची हत्या आणि दुकानदारांना दुकाने बंद करण्यासाठी धमकावणे हे प्रकार त्यातूनच घडत आहेत.