एकीकडे संपूर्ण जग करोना विषाणूशी लढा देत असताना, सीमेपलीकडून होणाऱ्या अतिरेकी कारवाया काही केल्या कमी होत नाहीयेत. जम्मू-काश्मीरच्या सोपोर भागात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPF च्या तीन जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी संध्याकाळी नाकाबंदी सुरु असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

“संध्याकाळी नाकाबंदी सुरु असताना आमच्या पथकावर अतिरेक्यांनी अचानक गोळीबार केला, आम्ही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र या घटनेत आमचे ३ जवान शहीद झाले आहेत.” CRPF च्या जम्मू-काश्मीर विभागाचे विशेष संचालक झुल्फीकार हसन यांनी इंडियन एक्स्प्रेस शी बोलताना माहिती दिली. या घटनेत एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकारानंतर जम्मू-काश्मीर पोलिस आणि CRPF च्या जवानांनी नजिकच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

गेल्या आठवड्याभरात भारतीय लष्करावर काश्मीरमध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात CRPF चा एक जवान जखमी झाला होता. शुक्रवारी, चार अतिरेकी काश्मीरमध्ये शिरले होते, त्यातील दोघांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आलं आहे. दरम्यान सोपोरमध्ये जवानांवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोध सुरु आहे.