जम्मू-काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (बुधवार) चकमक झाली. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दहशतवाद्यांना यमसदनी पाठवल्यानंतर सुरक्षादलाकडून शोध मोहीम राबवण्यात आली. मंगळवारी शोपियां येथे सुरक्षादलाबरोबर झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी मारले गेले होते. मंगळवारी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याच्या भावाचाही समावेश होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाने हेफ परिसरात नाकाबंदी करत शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर गोळीबार सुरू केला.

सात तास चाललेल्या या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा, दारूगोळा आणि काही दस्तऐवज जप्त करण्यात आले. शम्सूल हक मंगू, आमिर सुहेल भट आणि शोएब अहमद शाह असे मृत दहशतवाद्यांची नावे आहेत.

शम्सूल हक मंगू हा २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी इनामुल हक मंगू यांचा भाऊ होता. इनामूल सध्या पूर्वोत्तर राज्यात कार्यरत आहेत. शम्सूल हक श्रीनगर मधील एका महाविद्यालयात युनानी चिकित्सेचे शिक्षण घेत होता. गेल्यावर्षी तो दहशतवादी बनला. चकमकीनंतर स्थानिक आणि सुरक्षादलात संघर्ष झाला.