जम्मू-काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये सोमवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात व गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर तीन जवान जखमी झाले आहेत. येथील कृष्णा घाटीच्या परिसरात गेल्या काही वेळापासूनच पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. यावेळी पाकिस्तानी सैन्याने रॉकेटचाही मारा केल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असून सध्या दोन्ही दिशेने गोळीबार सुरू आहे.

आज सकाळी ८.३० वाजल्यापासून पाकिस्तानचा गोळीबार सुरू आहे. गोळीबार सुरू असतानाच पाक सैन्याने भारतीय जवानांच्या दिशेने रॉकेटचा माराही केला. यावेळी जखमी झालेल्या पाच जवानांपैकी दोन जवानांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने सीमारेषेवर २२८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर गेल्या महिन्यात सातवेळी शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याने हा तणाव आणखीनच वाढला आहे.