देशभरात रमजान ईद उत्साहात साजरा होत असताना श्रीनगरमधील फुटीरतावाद्यांच्या आंदोलनामुळे या सणाला गालबोट लागले. याठिकाणी ईदची नमाज संपल्यानंतर सय्यद अली गिलानी यांच्या समर्थकांनी हिंसक आंदोलनाला सुरूवात केली. गिलानींच्या समर्थकांनी पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे झळकावत पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीहल्ला आणि अश्रुधुराचा वापर केला. गेल्या दोन दिवसांपासून श्रीनगरमध्ये पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना आयएसआयएसचे झेंडे फडकवले जात असल्याची छायाचित्रे सोशल साईटसवर फिरत आहेत. त्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून फुटीरतावादी नेते अली शाह गिलानी यांना नजरकैदेत ठेवले होते. त्यांच्या या नजरबंदीविरोधात आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. तसेच त्यांना आज मशिदीमध्ये जाऊन नमाज पठण करण्याची परवानगी न मिळाल्याने आंदोलन आणखीनच चिघळले.