गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या झारखंडमध्ये सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. झारखंड मुक्ती मोर्चातर्फे आज, मंगळवारी सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे नेते हेमंत सोरेन राज्यपालांकडे तशा आशयाचे पत्र देतील.
भाजपप्रणीत आघाडी सरकारचा पाठिंबा झारखंड मुक्ती मोर्चाने काढून घेतल्याने ८ जानेवारीला झारखंडात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. या राजवटीची मुदत १८ जुलैला समाप्त होत आहे. या पाश्र्वभूमीवर झारखंड मुक्ती मोर्चाने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ८२ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चाचे १८ आमदार आहेत. त्यांना राजद (५) आणि काँग्रेस (१३) यांनी आधीच पाठिंबा दर्शवला आहे. मार्क्‍सवादी समन्वय समितीचे एकमेव आमदार अरुप चॅटर्जी यांच्यासह तीन अपक्ष आणि झारखंड जनाधिकार पक्षाचे आमदार बंधू तिर्की यांनी हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखालील झारखंड मुक्ती मोर्चाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या सर्वाची मोट बांधून हेमंत सोरेन सरकार स्थापनेच दावा राज्यपाल सईद अहमद यांच्याकडे आज, मंगळवारी दाखल करण्याची शक्यता आहे.