नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसरात ५ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता निश्चित करण्याबाबत उपाय सुचवण्यासाठी विद्यापीठाने पाच सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे, असे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले. सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या काय, याचीही समिती चौकशी करणार आहे.

आम्ही पाच सदस्यांची समिती स्थापन केली असून ती आमच्या अंतर्गत सुरक्षा समितीसोबत काम करेल. सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्यास त्याचीही चौकशी करून, विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही समिती उपाय सुचवेल, असे कुमार म्हणाले.

सुरक्षेच्या दृष्टीने कमजोर असलेले विभाग ओळखणे, तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह इतर उपाययोजना करणे याकडेही समिती लक्ष देणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

जेएनयू कुलगुरूंच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी मंडी हाऊसपासून मोर्चा

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आणि कुलगुरूंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि नागरी संघटनांचे शेकडो समर्थक गुरुवारी रस्त्यावर उतरले होते. निदर्शकांनी हातात फलक घेऊन मंडी हाऊसपासून मानव संसाधन विकास मंत्रालयावर मोर्चा काढला. या वेळी हल्लाबोल आणि इन्किलाब झिंदाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या.नो सीएए, नो एनआरसी, विद्यापीठ संकुलांमध्ये अभाविपवर बंदी घाला, शिक्षण ही खरेदी-विक्रीची वस्तू नाही अशा आशयाच्या घोषणा लिहिलेले फलक या वेळी निदर्शकांच्या हातात होते. संकुलात ५ जानेवारी रोजी हिंसाचाराचा उद्रेक झाला त्यामध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

माकप नेते सीताराम येचुरी, वृंदा करात, डी. राजा, प्रकाश करात आणि एलजेडीचे नेते शरद यादवही मोर्चात सहभागी झाले होते. कुलगुरूंना माहिती असल्याशिवाय असा हल्ला होऊ शकला नसता, असे येचुरी म्हणाले. कुलगुरूंना जावेच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शास्त्री भवनजवळ मोर्चा अडविला

जेएनयूतील हिंसाचाराच्या निषेधार्थ आणि कुलगुरूंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि नागरी संघटनांच्या सदस्यांनी मंडी हाऊसपासून मानव संसाधन विकास मंत्रालयावर काढलेला मोर्चा दिल्ली पोलिसांनी शास्त्री भवनजवळ अडविला.