जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याच्या घटनेनंतर आता विद्यापीठातील प्राध्यापक देखील सरकारच्याविरोधात गेले आहेत. प्रा. सी. पी. चंद्रशेखर हे जेएनयूतील घटनेच्या निषेधार्थ सरकारच्या आर्थिक डेटा समिक्षा समितीतून बाहेर पडले आहेत. त्यांनी या समितीतील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

प्रा. चंद्रशेखर यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये म्हटले की, मला हे सांगताना खेद वाटतो की, मी जिथे राहतो त्या जेएनयूमध्ये सध्या ज्या प्रकारची परिस्थिती आहे, त्यामुळे मी उद्याच्या बैठकीसाठी उपस्थित राहू शकणार नाही. मला वाटतं सध्याच्या परिस्थितीत ही समितीदेखील सांखिकीय प्रणालीची विश्वसनीयता राखण्यात यशस्वी होऊ शकणार नाही. सध्याच्या काळात याची विश्वासार्हता कमी झाली आहे. मी एक चांगली आर्थिक समिक्षा तयार करण्यासाठी खूपच मेहनत घेत होतो. मात्र, राजकीय दबावाने याच्या स्वतंत्र कारभारावर परिणाम झाला आहे. यामुळे एक चांगली यंत्रणा बनवण्याच्या प्रयत्नांवर त्याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत मी या समितीमध्ये आपली सेवा देऊ शकणार नाही.

आर्थिक आकडेवारीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून गेल्याच महिन्यात या समितीची निर्मिती करण्यात आली होती, आज तिची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर यातील एका सदस्याने राजीनामा दिल्याने याचा कामकाजावर परिणाम होऊ शकतो. जनसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

जेएनयूमध्ये ५ जानेवारी रोजी काही अज्ञात बुरखाधारक लोकांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ला केला होता. सुमारे पाच तास त्यांनी गोंधळ माजवला होता. या हिंसाचारात २८ लोक जखमी झाले होते. यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयेषी घोषचाही समावेश होता. हा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेने हा हल्ला केल्याचा आरोप विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केला होता. त्याचबरोबर पोलिसांनी देखील या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आले नाहीत असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.