दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव बदलून स्वामी विवेकानंद विद्यापीठ करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे महासचिव सी. टी. रवि यांनी केली होती. भाजपाच्या या मागणीला शिवसनेने विरोध दर्शविला आहे. ही मागणी राजकीय स्वार्थासाठी असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र, गोवा आणि तमिळनाडूच्या भाजपा प्रभारी पदी नियुक्त करण्यात आलेल्या सी. टी. रवि यांनी सोमवारी ट्विट करत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव बदलून स्वामी विवेकानंद विद्यापीठ करण्यात यावी अशी मागणी केली होती. यावर मागणीवर शिवसनेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. यावेळी राऊत यांनी स्वामी विवेकानंद यांचे नाव विद्यापिठाला हवे असेल तर त्यांच्या नावाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवे विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला भाजपाला दिला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

“स्वामी विवेकानंद आमच्यासाठी नेहमीच आदर्श होते. पण नाव बदलून काय होईल? त्याऐवजी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणखी एक मोठे विद्यापीठ स्वामी विवेकानंदांच्या नावाने स्थापन करणे आवश्यक आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू नेहमीच “देशाचा अभिमान” राहिले आहेत. त्यामुळे द्वेष आणि राजकीय हेतूसाठी विद्यापीठाचे नाव बदलणे योग्य ठरणार नाही” असं राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, “आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील” असे म्हणत भाजपावर निशाना साधला.