दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) कार्यक्रमात कथितरीत्या देशद्रोही घोषणा दिल्याबद्दल अटकेत असलेले विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांना दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी सहा महिन्यांचा अंतरिम (हंगामी) जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रितेश सिंग यांनी हा आदेश दिला.
जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्याबरोबर या दोघांनाही देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. कन्हैया कुमारची न्यायालयाने नुकतीच सुटका केली. उमर आणि अनिर्बन यांच्या गुन्ह्य़ाचे स्वरूपही सारखेच असल्याने त्यांनाही कन्हैया कुमारच्या समानच न्याय मिळाला पाहिजे या तत्त्वावर त्यांना सहा महिन्यांचा (१९ सप्टेंबपर्यंत) अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. प्रत्येकी २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.
उमर आणि अनिर्बनच्या वतीने संगीता दास गुप्ता आणि रजत दत्त हे जामीन म्हणून उभे राहिले. न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर करताना दिल्लीच्या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राबाहेर न जाण्याची आणि गरज भासेल तेव्हा न्यायालयात हजर राहण्याची अट घातली आहे.
दरम्यान या दोन विद्यार्थ्यांना जामीन मिळताच जेएनयूमध्ये जल्लोष करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.